शिक्षक-पालक-बालक धडा 2 – श्वास टिकेपर्यंत ‘अ’ आणि ‘आ’ स्वराचा उच्चार करणे
लहान मुलांना गम्मत कशात वाटते? आईने कचरा एकत्र केला की तो पुन्हा पसरून
टाकणे. शेंगांची टोपली समोर ठेवली की त्यातील शेंगा इतरत्र भिरकावणे. काही तरी
मुद्दाम वेगळी क्रिया करून त्यातून त्यांना मज्जा वाटते, आनंद मिळतो, कारण इतरांचे
लक्ष त्यातुन त्यांच्याकडे वेधले जाते. ही नैसर्गिक अत्यंत नैसर्गिक सवय लहानपणी
सर्वांना उपजतपणे स्फुरते.
मुलांच्या हातात खडू दिलात तर मिळेल त्या भिंती, फरशी, टेबल, दार यावर ते
रेघोट्या काढतात. काही तरी कार्यक्रम करण्याचा उद्योग त्यांना मिळतो आणि त्याचा
आनंद होतो. मोठ्यांच्या दृष्टीकोनातून हा वात्रटपणा, खोडकरपणा, बालीशपणा असतो पण
मुलांच्या विचारातून हाच आनंद आणि खेळ असतो. थोडक्यात म्हणजे काय? वस्तु आवण्यापेक्षा
पसारा घालणे, पाणी पुसण्यापेक्षा सांडवणे, शेंगा भरण्यापेक्षा इतस्ततः फेकणे ही
मज्जा असते.
अगदी त्याचप्रमाणे ‘प्रमाणीतपणे उच्चार’ करण्यापेक्षा ‘उच्चाराचा पसारा घालणे’,
‘उच्चार इतस्थतः भिरकावणे’, ‘उच्चार मुक्तपणे फेकणे’ हा त्यांना खेळ वाटतो. त्यासाठीच
त्यांना ‘अऽऽऽऽ’ आणि ‘आऽऽऽऽ’ स्वर श्वास टिकेपर्यंत मुक्त मोठ्याने उच्चारायला
सांगा. हे असे उच्चार करताना त्यांना कधी धावायला, तर कधी स्वतः भोवती गोल फिरायला,
तर कधी दुसर्याचे हात धरून रिंगण धरायला सांगा. हालचाल (स्पर्श), कान (ऐकणे), उच्चार
(बोलणे) यांचा चैतन्यपूर्ण धांगडधिंगाणा म्हणाना ! यातून श्वास टिकेपर्यंत पण कधी
हळू आवाजात तर कधी मोठ्या आवाजात त्यांना ‘अऽऽऽऽ’ आणि ‘आऽऽऽऽ’ स्वर म्हणायला
लावावेत.
यातून स्वरांची अक्षरे मेंदूतील केंद्रात व्यवस्थीतपणे प्रस्थापीत होऊन
त्यांचा हवा तेव्हा पटकन उच्चार करायची सवय मुलांना लागते. हा उच्चाराचा व्यायाम
झाला. जसा व्यायाम जास्त वेळ करायचा नसतो तसाच हा उच्चार-व्यायामही केवळ पाच
मिनीटेच करावा. तासाभराच्या वेळेनंतर त्याची पुन्हा केवळ पाच मिनीटे तालीम घ्यावी.
या श्वास टिकेपर्यंत उच्चार-व्यायामाचा अतिरेक करू नये.
‘अ’ स्वराचा उच्चार जिभेच्या स्वाभाविक आरामदायी स्थितीतून होतो तर ‘आ’
स्वराचा उच्चार जिभेचा मधला भाग जरा खाली खेचल्याने साध्य होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727