गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

शिक्षक-पालक-बालक धडा 5 – ‘अ, इ, उ’ यांच्या उच्चारांचा जिभेचा व्यायाम



मागच्या धड्यातील व्यायामामुळे मुलांना ‘अ, आ, इ, उ’ हे उच्चार ऐकून कळतील इतपत ठीकपणे येऊ लागतील. त्या धड्यात प्रत्येक उच्चार क्रमाने तीन वेळा केला. कार चालवायला शिकायची असेल तर कार पहिल्या गिअर मध्ये उचलून स्थिर स्थितीतून हळूवारपणे पुढे जाता येणे हा टप्पा जसा महत्त्वाचा ठरतो, तसेच उच्चाराच्या गाडीचे आहे. कार पुन्हा पुन्हा बंद करून, पुन्हा पुन्हा पहिल्या गिअर मध्ये उचलता येऊन पुढे नेता येऊ लागली की त्या शिक्षणातील खूप महत्त्वाचा टप्पा गाठला जातो. तसेच ‘अअअ’ तीनवेळा क्रमाने म्हणताना ‘अ’ उच्चाराची गाडी तीन वेळा बंद करून पुन्हा पुन्हा सुरू करावी लागते. चला, म्हणजे यातून उच्चाराची गाडी सुरू करणे जमू लागले म्हणायचे तर!

कमी वेगात इंग्रजी आठ (8) आकड्याची वळणे जर तुम्हाला कार चालवताना घेता येऊ लागली तर कार चालवण्याचे संतुलन येऊ लागले असे म्हणता येते. आठ आकड्याचे वळण घेऊन कार पुन्हा सुरवातीच्या जागेवर येते की वळण घेता घेता सुरवातीपेक्षा बरीच लांब पोचते? यावर ड्रायव्हींगचे संतुलन कळून येते. अगदी तसेच जिभेच्या मागे-पुढे आणि वर-खाली या हालचालींचा व्यायाम करून, उच्चार पूर्ण झाल्यावर प्रत्येकवेळी जिभेला तिच्या सामान्य आरामदायी स्थितीत पोचवणे गरजेचे असते. हाच तर मराठीचा उच्चारांचा उपजत मूलभूत स्वभाव आहे.

या धड्यात आता त्यांना उच्चारात ‘अ, आ, इ, उ’ हे स्वर पटकन पकडता येण्यासाठीचा जिभेचा व्यायाम आपण करणार आहोत. या व्यायामामुळे मुलांना ते स्वर उच्चारल्यानंतर विराम घेणे व नंतर पुन्हा पटकन दुसरा स्वर गाठणे व नंतर पुन्हा विराम घेणे व नंतर पुन्हा पटकन दुसरा स्वर गाठणे या क्रियेतून तोंडाच्या गाभार्‍यात जिभेकडून सुद्धा जणू आठ (8) आकड्याचे वळण घेतले जाते.

उच्चाराची आज्ञा मेंदूतून निघून स्वरयंत्र ते ओठ या सर्व अवयवांना एकाच वेळी ठराविक हालचाल करण्याची निश्चित ओळख व सवय होते. ‘स्वरयंत्र, पडजीभ, जबडा, जिभ, ओठ’ आणि ‘मुखातून योग्य प्रमाणात हवा बाहेर फेकणे’ अशा बर्‍याच क्रिया एकत्रीत व एकाच योग्य वेळी झाल्या की एक उच्चार साध्य होतो. मुलांना त्या लहान वयात जर उच्चाराचे योग्य मार्गदर्शन मिळाले तर मग पुढे आयुष्यभर त्यांचे उच्चार निश्चितपणे योग्य आणि अचूक होतात.

यासाठीच्या उच्चाराच्या व्यायामाचे दोन प्रकार दिले आहेत. हा व्यायाम केवळ पाच मिनिटे, दिवसातून जास्तीत जास्त तीन वेळा, केवळ तीन दिवस केला तरी पुरेसे होते. ‘अ’ उच्चारातील जिभेची स्थिती सामान्य आरामदायी असते. ‘आ’ उच्चारातील जिभेची स्थिती मध्यावरच पण खालच्या बाजूला असते.

व्यायाम पहिला – अइअ, अउअ.
पहिला व्यायामात स्वल्पविरामाच्या जागी थांबून, मग पुढील उच्चार करावेत. पहिल्या व्यायाम पुढीलप्रमाणे करावा.
विराम
विराम
विराम

व्यायाम दुसरा – आइआ, आउआ.
दुसरा व्यायामात स्वल्पविरामाच्या जागी थांबून, मग पुढील उच्चार करावेत. दुसरा व्यायाम पुढीलप्रमाणे करावा.
विराम
विराम
विराम

या दोन व्यायामामुळे जिभेला ‘अ’ आणि ‘आ’ स्वरांकडून ‘इ’ आणि ‘उ’ कडे पटकन व सहजतेने झेपावण्याची सवय होते. या व्यायामातून नक्की काय घडते? ते पुढील चित्रातून स्पष्ट होईल. उच्चारात जिभेची गाडी कुठून सुरू होते, कशी कशी जाते आणि कुठे संपते, ते चित्रातून दिलेल्या बाणांतून आणि क्रियांच्या क्रमांतून कळेल.


या व्यायामातून इंग्रजी आठ (8) आकड्याची वळणे घेण्याची जणु सवय जिभेला लागते. लहानपणी आपल्या उच्चारांच्या अनुभवांची कोठारे रिकामी असतात. ती एकदा भरली की मग आयुष्यभर त्यांचा आपण इतका मनसोक्त मुबलकपणे व सहजतेने वापर करतो की त्या उच्चारांचे शिक्षण आपल्याला असे कधी घ्यावे लागले होते हेही विसरतो.

आधुनिक भाषांमध्ये सामान्यपणे 'अ, आ, इ, उ' उच्चार आहेत.कोणत्याही मानवी भाषेला हे उच्चार अचुकतेने शिकण्याचे धोरण मराठीकडून मिळु शकेल. उदाहरण - जपानी भाषेत 'अ' नाही, केवळ 'आ' आहे. पण त्याही मुलांना लहानपणी 'अ' शिकवता येतो. हो, हे साधार सिद्ध केले आहे. आमच्या नातेवाईकाने जपानी मुलीशी लग्न केले असून त्यांच्या मुलांना 'अ' येतो. कोणत्याही मानवाच्या भाषेला उच्चार-शास्त्राची
आधुनिक पद्धत मराठीकडून शिकता येईल.
बस्स, सोपा सुटसुटीत पण परिणामकारक ठरणारा हा व्यायाम म्हणजे मराठी उच्चार-शास्त्राची संस्कार-साधनाच ठरते.
आपला, शुभानन गांगल
मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727