बुधवार, ८ जानेवारी, २०१४

शिक्षक-पालक-बालक धडा 3

शिक्षक-पालक-बालक धडा 3 – श्वास टिकेपर्यंत ‘इ’ आणि ‘उ’ स्वराचा उच्चार करणे
घसरगुंडी वरून घसरण्यासाठी जेव्हा घसरगुंडीच्या अगदी वर मुलांना आपण नेतो तेव्हा मुले घाबरलेली असतात. मुल प्रथम एकदा घसरगुंडीवरून घसरले की ‘काहीही दुखापत होत नाही, सुसाट वेगाने जाण्यात मज्जा येते’ ही गोष्ट त्याच्या/तिच्या मनात ठसते. आपण बागेत ‘सी-सॉ’चा उपयोग मुलांसाठीचा खेळ व गंमत म्हणून करतो. कधी वरती तर कधी खालती. यात मुलांना तेव्हाच गंमत वाटते जेव्हा अशा खेळातून ‘आपण पडणार तर नाही ना?’ याची खात्री पटते. काहीसे तसेच ‘इ’ आणि ‘उ’ स्वराच्या उच्चाराच्या वेळी घडते. तोंडाच्या गाभार्‍यात जिभ सुद्धा ‘सी-सॉ’ सारखी मध्यभागी चिकटलेली राहून पुढून व मागून वरखाली होऊ शकते. जिभेचे पुढील टोक जेव्हा तोंडाच्या गाभार्‍यात दाताकडील पुढच्या बाजूला वर असते तेव्हा ‘इ’चा उच्चार शक्य होतो. केवळ याच ठिकाणी जिभ असली तरच हा उच्चार मानवाला करता येतो. तसेच जेव्हा जिभ वरच्या जबड्यातील मागच्या बाजूला टाळुकडे वर असते तेव्हा ‘उ’ उच्चार शक्य होतो. केवळ याच ठिकाणी जिभ असली तरच हा उच्चार मानवाला करता येतो. जिभ अशा योग्य ठिकाणी नेऊन हा उच्चार साधता येणे हे प्रत्येकाने लहानपणी स्वतःच शिकलेले असते. हा व्यायाम खरच साधासोपा नसतो. आई-बाबा, आजी-आजोबा यांचा ‘इ’ व ‘उ’ उच्चार ऐकणे, त्या उच्चाराचा मनात संग्रह करणे,  तशा उच्चाराची नक्कल करणे, स्वतःचा उच्चार स्वतः ऐकणे, स्वतःचा उच्चार ‘संग्रह केलेल्या ‘इ’ व ‘उ’ सारखा’ येईपर्यंत प्रयत्न करत राहणे, अशा असंख्य गोष्टी प्रत्येकाला लहानपणी कराव्या लागतात. पण एकदा का हे आपण शिकलो की ते अंगवळणी पडते आणि मोठेपणी ‘इ’ व ‘उ’चा उच्चार असा होतो हेही आपण विसरून जातो. लहानमुलांसाठी हे सारे नवे असते आणि हे त्यांच्यासाठी नवे आहे हे ओळखणे आणि त्यांना यात योग्य ती मदत करणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे महत्त्वाचे काम ठरते.
‘इऽऽऽऽ’ आणि ‘उऽऽऽऽ’ यांचा उच्चार श्वास टिकेपर्यंत लांब करायला शिकवणे हे महत्त्वाचे ठरते. यामुळे उच्चाराला निश्चितपणा प्राप्त होतो. श्वास टिकेपर्यंत लांब उच्चार केल्याने त्या पूर्ण वेळेसाठी जिभ त्याच नेमक्या ठिकाणी स्थिर ठेवायला आपण शिकवत असतो. यातून मेंदूतील केंद्रात प्रस्थापीत होणारी ‘इ’ व ‘उ’ यांच्या उच्चाराची आज्ञा नीटपणे गोंदवली जाते. एकदा जिभेला स्वर उच्चारांचा असा व्यायाम झेपला व सहजतेने करता येऊ लागला की उरलेल्या स्वर आणि नंतर व्यंजनांचा उच्चार त्यानंतर सहजगत्या शिकता येतो. लहानवयात जिभेला असे उच्चाराचे वळण लागले की ते आयुष्यभर टिकते. केवळ मराठीतल्या स्वर-व्यंजन-अक्षर यांच्या या उच्चार-व्यायामामुळे आयुष्यात पुढे इतर कोणत्याही भाषेतील उच्चार करता येतात. नाहीतर गुजराती, हिन्दी भाषीकांना जसे ‘अॅ’ व ‘ऑ’ उच्चार नंतर आयुष्यभर जमत नाहीत तसे मराठी मुलांचे होऊ शकेल. पुढे आयुष्यात मुलांनी जरी इंग्रजी, गुजराती, हिन्दी, . . अशा कोणत्याही भाषा शिकल्या तरी त्यांचे उच्चार नीट होतात.
मुलांना यावेळी केवळ ‘इ’ व ‘उ’ हेच उच्चार आपण शिकवत असतो. स्वर-उच्चारातून केवळ कोणता नाद, आवाज, ध्वनी ऐकून कळतो, जाणवतो, लक्षात येतो, तेच आधी शिकवायचे असते. या व्यायामातून हेच अचूकतेने साध्य होते. नंतरच्या आयुष्यात संवादासाठी उच्चारातील कमी-अधिक वेळ साधून ‘इ आणि ई’ आणि ‘उ आणि ऊ’ यातील फरक आपण वापरतो. पण लहानमुलांसाठी ते जाणण्याचे हे वय नव्हे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. मुलांना झेपेल, जमेल, उमगेल, कळेल, रुचेल असेच हे क्रमवार धडे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727