मानव भाषा शिकतो कशी आणि निसर्गाने मानवाला त्यासाठी कोणती योजना दिली आहे?
निसर्गाने मानवाला भाषा दिली नाही. भाषा निर्माण करण्याची आणि शिकण्याची केंद्रे मेंदूत दिली आहेत. जन्मानंतर आपल्याला आपल्या कुटूंबाची भाषा शिकवली जाते. ‘आई, बाबा, काऊ, चिऊ, दुदू, पाणी’ अशा छोट्या शब्दांच्या उच्चारातून आपण लहान मुलांना त्या व्यक्ति, प्राणी वा वस्तू दाखवून, उच्चाराचा संबंध अर्थाशी जोडायचा व्यायाम मुलांना देतो. भाषा शिकायची सुरवात अशी होते.
लहान बाळासमोर तुम्ही ‘दादा’ म्हणा. तो ते शब्द ऐकतो. नक्कल करण्याची उपजत बुद्धी निसर्गाने मानवाला दिली आहे. जर ‘दादा’ हा शब्द लहान बाळाला ‘आजी-आजोबा, आई-बाबा, ताई-भाऊ’ यांनी ऐकवला. तर त्यातील ‘आजीच्या प्रेमळ, आजोबांच्या थकलेल्या, आईच्या मायाळू, बाबांच्या राकट, ताईच्या आपुलकीच्या, भावाच्या खोडकर, . . .’ वगैरें पैकी कोणत्याही आवाजाची नक्कल करायची नसून त्या सर्वांच्या उच्चारातील समान सारखेपण असलेल्या ‘दा’ अक्षराची नक्कल करायची आहे, हे मुलाच्या लक्षात येते. लहान बाळांना केवळ एकाच व्यक्तिने उच्चार शिकवण्या ऐवजी प्रारंभी तरी जास्त व्यक्तिंनी त्यात भाग घ्यावा. एकाच अक्षराची पुनरावृत्ती असलेले छोटे शब्द बाळांना चटकन आत्मसात करता येतात. म्हणून ‘दुध’ पेक्षा ‘दुदु’, ‘भाऊ’ पेक्षा ‘दादा’, ‘जेवण’ पेक्षा ‘ममं’ मराठीतून शिकवले जातात.
‘दादा’ शब्द बर्याच वेळा ऐकला की तो बाळाच्या मेंदूत संग्रहीत होतो. मग बाळ स्वर-यंत्र ते ओठ या उच्चारकर्त्या अवयवांचा वापर करून ‘दादा’ म्हणायचा प्रयत्न करतो. बाळाने स्वतः केलेला उच्चार त्याला स्वतःला ऐकू येतो. स्वतःचा उच्चाराची, इतरांकडून आधी ऐकलेल्या उच्चाराशी त्याला नैसर्गिक उपजतपणे तुलना करता येते. ‘आधी ऐकला उच्चार’ आणि ‘स्वतःने केलेला उच्चार’ समान असल्याचे त्याचे त्याला कळते. त्याबद्दल मिळालेल्या शाबासकीमुळे त्याची उच्चाराबाबत खात्री होते. मग तो उच्चार बरेच वेळा करून त्या उच्चाराचा व्यायाम केला जातो. यातून त्या व्यंजन-स्वर-अक्षर यांच्या उच्चाराच्या निश्चित आज्ञा मेंदूत संग्रहीत होतात. याचाच अर्थ ‘अक्षर’ ही भाषीक संकल्पना मेंदूत प्रस्थापीत होते. त्यानंतरच ती उच्चारातून हवेच्या माध्यमात आणि नंतरच्या आयुष्यात चिन्ह-स्वरूपातून कागदावर व फॉण्ट-स्वरूपातून संगणकात वावरते.
मंगळवार, ७ जानेवारी, २०१४
+मानव भाषा शिकतो कशी?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727