मंगळवार, २१ जानेवारी, २०१४

शिक्षक-पालक-बालक धडा 4

शिक्षक-पालक-बालक धडा 4 – ‘अ, इ, उ’ यांच्या अचूक उच्चारांसाठीचा व्यायाम

उच्चाराला सुरवात, शेवट आणि त्यामधला प्रवास असतो. ‘उच्चाराच्या सुरवातीच्या आधी’ आणि ‘उच्चाराचा शेवट झाल्यानंतर’ विराम येतो. या आधीच्या आणि नंतरच्या विरामामुळे उच्चाराला निश्चितता मिळते.

कशाचीही ‘सुरवात’ आणि ‘शेवट’ होताना काय घडते? तो कसा होतो? ते आपण पाहू. पोहण्याची सुरवात होते खेळाडू उभे राहतात त्या स्टुलावरून, कारच्या रेसिंगची सुरवात होते कार स्थिर असणार्‍या स्थितीपासून. पोहण्याच्या शर्यतीत शेवटच्या भिंतीला हात लावायचा असतो, तेव्हा पूर्ण गतीने किती खेळाडू पोहतात? असा प्रश्न निर्माण होतो. अशामुळे पोहण्यातील खेळाडूंचा वेग वा कारचा खरा स्पीड ‘सुरवातीला’ आणि ‘शेवटी’ नीटपणे कळतोच असे ठामपणे म्हणता येत नाही. अगदी तसेच नव्याने शिकणार्‍या मुलांच्या बाबतीत घडते.

नव्याने शिकलेल्या व्यक्तिचे वाचन ‘गवत’ शब्द ‘ग व त’ असे तुटक म्हणजेच प्रत्येक अक्षरातील स्वरानंतर जास्त विराम घेतल्यासारखे असते. असे घडते कारण लिहीलेले वाचताना आधी आपण दिसणार्‍या एकेका अक्षराची नीट ओळख मनाला पटवून वाचतो. जेव्हा शब्दाचे एकत्रीत चित्र आणि त्याचा उच्चार असे समिकरण मनात स्थिर होते तेव्हा तो शब्द पटकन अचूकतेने उच्चारला जातो.

उदाहरण – ज्यांना वाचनाची सवय नाही त्यांना ‘चहा’ शब्द ‘च्यहा’ असा उच्चारायचा आहे ते कळणार नाही. तसेच ‘चमचा’ शब्द ते कदाचीत ‘च्यमच्या’ असा उच्चारतील.

अन्यथा सराव असलेल्या व्यक्तिचे ‘गवत’ शब्दाचे वाचन, ‘ग’ मधला ‘अ’ हा ‘नियमीत’ उच्चाराचा, ‘व’ मधला ‘अ’ लांबट उच्चाराचा आणि ‘त’ मधला ‘अ’ अपुर्‍या उच्चाराचा ठरतो. हे सारे मेंदूत मराठीचा नीट संस्कार झाल्यावरच घडते. आपण येथे दिलेल्या व्यायामातून हेच साध्य करत आहोत.

मराठी भाषेतील लिपी ‘उच्चार, अक्षर, चिन्ह, लेखन आणि अर्थ’ यांचा परस्पर संबंध प्रत्येकवेळी निश्चित करत करत मनात कोरली जाते. ही मराठी शिक्षणाची गुरूकिल्ली ठरते. आपण लहान मुलांतील उच्चार त्यांच्या मेंदूतील केंद्रात प्रस्थापीत करण्याचे काम येथे करत आहोत. योग्य प्रकारे अक्षराची प्रतिष्ठापना मेंदूतील केंद्रात होण्यासाठी ‘अ’, ‘इ’ व ‘उ’ यांच्या अचूक उच्चाराच्या आज्ञा मेंदूत स्थापन होणे गरजेचे ठरते. त्यासाठी ‘अअअ’ अशा प्रकारे ‘अ’ स्वर क्रमाने तीनदा उच्चारला की त्यातील मधल्या ‘अ’चा उच्चार अचूक ठरतो कारण त्याच्या आधीचा आणि नंतरचा विराम ‘दोन अक्षरांमधला योग्य विराम’ ठरतो. जेव्हा इलेक्टॉनिकली स्वरांचा ग्राफ काढायचा असतो तेव्हा हे तंत्रज्ञान मी वापरले आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी अक्षर-उच्चाराचे अचूक ग्राफ घेऊन त्यांच्याशी इतर उच्चारांचे बारकावे तपासता येतात.

हेव मराठी तंत्रज्ञान घरगुती पद्धतीतून मराठी शिकवताना वापरता येते. वरील विवेचन झाले ते केवळ पालक व शिक्षक यांना पुढील भाग असाच का? याचे स्पष्टीकरण देण्यासाठी. आता मुलांना ‘अ’, ‘इ’ व ‘उ’ उच्चारांचा व्यायाम देण्यासाठीची सोपी पद्धत देत आहे.

मुलांना पुढील ओळी जमेल तशा तालात लयीत म्हणायला सांगा. यातील प्रत्येक अक्षराचा उच्चार समान कालमापनात करायचा आहे. ‘अ’चा उच्चार थोडा लांबवत ‘आ’ एवढा करत मुलांना सहज म्हणता येते. जसे आपण छंद या काव्य-स्वरूपात प्रत्येक अक्षराचा उच्चार समान म्हणजे ‘गुरू’ वा ‘दीर्घ’ करतो तसेच इथे म्हणा. यातून ध्वनीतील केवळ, निव्वळ, फक्त ‘जातीगुणवैशीष्ट्य’ मेंदूत प्रस्थापीत होते. कोणत्या अक्षराचा उच्चार कमी वा जास्त वेळेत होतो? कोणत्या फ्रिक्वेन्सीत (उच्च वा नीचपणात) ते म्हणायचे? कोणत्या लाऊडनेसमध्ये (लहान की मोठ्या आवाजात) ते म्हणायचे असा प्रश्न या उच्चारांची नक्कल करताना मुलांच्या मनात कळत नकळत सुद्धा यामुळे डोकावणार नाही.

उच्चाराच्या व्यायामाचे दोन प्रकार दिले आहेत. असा बदल केल्याने मुलांना कंटाळा येत नाही व योग्य व्यायामही घडतो. हा व्यायाम केवळ पाच मिनिटे, दिवसातून जास्तीत जास्त तीन वेळा, केवळ तीन दिवस केला तरी पुरेसे होते. आठवणींतून मागच्या दिवसाचे उच्चार उलगडून ते म्हणताना मेंदूतील उच्चारांच्या प्रतिष्ठापनेची क्रिया पूर्ण होते आणि आयुष्यभर टिकते.

1)       आआआ अअअ,
आआआ इइइ,
आआआ उउउ.
(हा व्यायाम पाच मिनीटे द्या. स्वल्पविरामाच्या जागी थांबून, मुलांना म्हणू द्यावे व मग पुढे जावे.)
2)       अअअ आआआ अअअ,
इइइ आआआ इइइ,
उउउ आआआ उउउ.
(हा व्यायाम पाच मिनीटे द्या. स्वल्पविरामाच्या जागी थांबून, मुलांना म्हणू द्यावे व मग पुढे जावे.)

बस्स, सोपा सुटसुटीत पण परिणामकारक ठरणारा हा व्यायाम म्हणजे मराठी उच्चार-शास्त्राची संस्कार-साधनाच ठरते.



आपला, शुभानन गांगल
मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या अभिप्रायासोबत कृपया आपला ईमेल आणि मोबाईल जोडलात तर संपर्क साधायला सोपे पडेल.
आपला, शुभानन गांगल 9833102727